2028 लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश : टी 20 फॉरमॅटमध्ये रंगणार सामने : सहा संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशावर शिक्केमोर्तब झाले असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने याला मान्यता दिली आहे. 1900 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता, त्यानंतर झालेल्या स्पर्धांमधून क्रिकेट वगळण्यात आले होते. पण, आता पुन्हा एकदा समावेश केल्याने, तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी पहायला मिळणार आहे. 1900 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन फक्त या दोन संघांनीच या खेळात भाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी नियम बनवले आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 90 खेळाडू पात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत, ऑलिम्पिकमध्ये पुरुष व महिला गटात फक्त सहा संघ सहभागी होऊ शकतील, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या संघात 15 खेळाडूंचा समावेश असेल. पात्रता प्रक्रियेबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही, परंतु यजमान म्हणून अमेरिकेला थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. आयसीसी क्रमवारीतील टॉपच्या सहा संघांना सहभागी होता येणार आहे. अर्थात, हे सर्व सामने टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत.
सहा संघांचा सहभाग
अमेरिकेला 2028 च्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला तर पात्रतेसाठी फक्त 5 जागा रिक्त राहतील. जर संघ रँकिंगच्या आधारे पात्र ठरले तर सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे पुरुषांच्या टी 20 मध्ये जगातील टॉप 5 संघ आहेत. तर महिला टी20 संघांच्या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या पाच स्थानांवर आहेत.
पाच नव्या खेळांचा समावेश
ऑलिम्पिक समितीने लॉस एंजिल्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पाच नव्या खेळांचा समावेश केला असल्याचे गुरुवारी जाहीर केले. यामध्ये बेसबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस व स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 351 पदक स्पर्धा होतील, जे 2024 च्या पॅरिसमधील 329 स्पर्धांपेक्षा 22 अधिक आहेत. एकूण खेळाडूंची संख्या 10,500 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.









