ओटवणे /प्रतिनिधी
Four youths saved the woman’s life by donating blood!
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने जपले रक्ताचे नाते
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या महिलेला दुर्मिळ अशा बि निगेटिव्ह रक्ताची गरज होती. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ यांच्याशी संपर्क साधताच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून तात्काळ चौघा युवकांनी रक्तदान करीत या महिलेचे प्राण वाचविले.वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावातील श्रध्दा ताम्हणकर याना दुर्मिळ बी निगेटिव्ह गटाच्या ६ रक्तदात्यांची आवश्यकता होती. रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे ताम्हणकर कुटुंबीय चिंतेत असतानाच त्यांच्या नातेवाईकांनी महेश राऊळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महेश राऊळ यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधत प्रथम जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या २ रक्तपिशव्या उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर चार रक्तपिशव्यांसाठी प्रतिष्ठानने आवाहन करताच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते अवधूत सामंत (दाभोली), गुणाजी परब (रानबांबुळी, सिंधुदुर्ग), सहदेव सावंत (परुळे), बाबूराव मुळीक (सावंतवाडी) यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जिल्हा रक्तपेढीत रक्तदान केले. या चारही रक्तदात्यांसह सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे ताम्हणकर कुटुंबियांनी आभार मानले. दरम्यान सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे मालवण सदस्य आनंद वाईरकर हे रक्तदान करण्यास गेले होते मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही.
दुर्मिळ गटाच्या या रक्त उपलब्धतेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, जिल्हा सहखजिनदार अमेय मडव, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अँलिस्टर ब्रिटो, खजिनदार भूषण मांजरेकर, सदस्य बाळकृष्ण राऊळ, पत्रकार आबा खवणेकर, दीपक राऊळ (कोचरा), प्रसाद निर्गुण, आत्माराम सामंत, प्रशांत जाधव (कुडाळ), सायली आचरेकर (आचरा), स्वाती राणे (कणकवली) आदी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नियोजन केले.









