धुपदाळनजीकच्या नदीत पोहण्यासाठी गेले असता घडली दुर्घटना : दोघे बचावले : तरुण मूळचे मुंदगोडचे
बेळगाव ; पोहण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी चौघा जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी धुपदाळजवळ ही घटना घडली असून या घटनेतून दोघेजण बचावले आहेत. बुडून मृत्यू झालेले सर्वजण कारवार जिल्ह्यातील मुंदगोड तालुक्यातील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी सुटीचा दिवस असल्यामुळे सहा मित्र पोहण्यासाठी घटप्रभा नदीपात्रात उतरले होते. यापैकी चौघा जणांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी धुपदाळला धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. संतोष बाबू इडगे (वय 19), अजय बाबू जोरे (वय 19), कृष्णा बाबू जोरे (वय 19), आनंद विठू कोकरे (वय 20) चौघेही राहणार शिरगेरी, ता. मुंदगोड, जि. कारवार अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेतून विठ्ठल जानू कोकरे (वय 19), रामचंद्र कोकरे (वय 19) हे दोघेजण बचावले आहेत. सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण घटप्रभामधील एका बारमध्ये काम करीत होते. शुक्रवारी दारूविक्री बंद असल्यामुळे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धुपदाळ सरकारी विश्रामधामजवळ घटप्रभा नदीपात्रात गेले होते. पोहताना चौघेजण दगावले. बचावलेल्या दोघाजणांना घटप्रभा येथील केएचआय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. नदीपात्रात बुडालेल्या बहुतेकांना पोहायला येत होते. मात्र, पाण्याखाली असलेल्या चिखलामध्ये त्यांचे पाय रुतल्याने ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटप्रभा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून मुंदगोड तालुक्यातील त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे.