नागपूर येथे होणार 20 जूनपासून स्पर्धा
बेळगाव : गदग येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती संघाच्या निवड चाचणीत बेळगाव जिल्हा क्रीडा वसतिगृहातील चार महिला कुस्तीपटूंची निवड करण्यात आली आहे. नागपूर येथे दि. 20 ते 24 जून या कालावधीत होणाऱ्या 15 वर्षांखालील राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य कुस्ती संघात बेळगावच्या कुस्तीपटूंची निवड झाली आहे. बेळगाव जिल्हा युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाच्या (डी.वाय.ई.एस) क्रीडा वसतिगृहात प्रशिक्षण घेणाऱ्या चार महिला कुस्तीपटूंची 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव डीवायईएस क्रीडा वसतिगृहातील संध्या शिरहट्टी (42 किलो वजनी गटात), नंदिनी (54 किलो वजनी गटात), सानिका हिरोजी (58 किलो वजनी गटात), श्रावणी तरळे (62 किलो वजनी गटात) यांची निवड झाली आहे. या सर्व कुस्तीपटूंना बेळगावच्या कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील, प्रशिक्षक मंजुनाथ मादार यांचे मार्गदर्शन तर बेळगाव जिह्याचे उपसंचालक डी.डी. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन मिळत आहे. महिला मल्लांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









