जळगाव / प्रतिनिधी :
गेल्या आठवडयापासून उष्णतेच्या लाटेने जळगाव जिल्हा भाजून निघत असून, जिल्ह्याचे तापमान हे 46 अंशावर पोहचले आहे. या वैशाख वणव्यामुळे दुपारी अघोषित संचारबंदीचे चित्र दिसत असून, चार दिवसात उष्माघाताचे चार बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुपारी गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्यात रविवारी सर्वच तालुक्यात 46 अंशाहून अधिक तापमान नोंदवले गेले. यात सर्वाधिक 46.9 अंश तापमान चोपडा येथे नोंदवले गेले. सध्या 45 अंश तापमान नोंदवले जात आहे. या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना अकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत बाहेर पडणे कठीण जात आहे. परिणामी दुपारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याने अघोषित संचारबंदीचे चित्र दुपारी दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने दुपारी 12 ते 5 यावेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. उन्हाचा त्रास जाणवल्यास तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याच्या सूचना केल्या असून, जिल्हा रूग्णालयात उष्माघात कक्ष उघडण्यात आलेला आहे.
मागील 4 दिवसात उष्माघाताचे 4 बळी
जिल्ह्यात मागील 4 दिवसात उष्माघाताचे 4 बळी गेले आहेत. अमळनेर येथील रूपाली राजपूत ही (33) विवाह सोहळयास बाहेरगावी गेली होती. तिथून परतल्यावर उष्माघाताचा त्रास झाल्याने तिला रूग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत रावेर येथील 39 वर्षीय नम्रता दिनेश चौधरी ही महिला बाहेरगावी गेली असता परत येतांना भोवळ येऊन कोसळली. रूग्णालयात नेले असता तिला मृत घोषित केले गेले. तिसऱ्या घटनेत भडगाव तालुक्यातील कजगाव येथील अक्षय रत्नाकर सोनार हा 29 वर्षाचा युवक तसेच पुण्यास नोकरी करीत असलेला व भुसावळला आजीच्या तेराव्याला आलेला गिरीश शालीग्राम चौधरी (29) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला.