चौदा दुचाकी जप्त : बैलहोंगल पोलिसांची कारवाई : 10 लाखांचा ऐवज ताब्यात
वार्ताहर/बाळेकुंद्री
विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना बनावट चावी वापरून चोरणाऱ्या चार चोरांना बैलहोंगल पोलिसांनी धाड टाकून अटक केल्याची घटना बैलहोंगल-बेळगाव रस्त्यावर घडली. बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील अभिषेक बाबू होसेट्टी, सचिन ईराप्पा बडगेर, अभिषेक सुरेश पारिश्वाड, संदीप ईराप्पा बडगेर अशी चोरट्यांची नावे असून त्याना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी बैलहोंगल कारागृहात करण्यात आली आहे. बैलहोंगल पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या हिरोहोंडा, यामाह, बजाज अशा विविध कंपन्यांच्या 10 लाख किमतीच्या चौदा दुचाकी जप्त केल्या. 6 डिसेंबर रोजी बैलहोंगल पोलीस ठाण्यातील पीएसआय पी. एस. मुरनाळ व कर्मचारी बैलहोंगल रस्त्यावर वाहनाची कागदपत्रे कसून तपासणी करताना वरील चार आरोपी दोन मोटारसायकलवरून जाताना पोलिसांनी अडविले व त्यांची कसून चौकशी केली. यावेळी चोरट्यांनी बेळगाव गोकाक व बैलहोंगलमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीसप्रमुख श्रुती एस. आय. बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय पंचाक्षरी सालीमठ, पीएसआय पी. एस. मुरनाळ व पोलीस एस. वाय. मेनसिनकाय, व्ही. एम. दोड्डव्हनप्पनावर, एम. बी. कंभार, सी. एस. बुदनी, एस देशनूर यांनी वरील कारवाई केली.









