बारामुल्लामध्ये तीन, अनंतनागमध्ये एकाला कंठस्नान घालण्यात यश : उरीच्या हथलंगा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक.पाकिस्तानी हद्दीतून गोळीबार, मृतदेह हस्तगत करण्यात अडचण
वृत्तसंस्था /बारामुल्ला
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. तर अनंतनागमध्ये अन्य एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याने एकंदर चार दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात सुरक्षा यंत्रणांना यश प्राप्त झाले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेली चकमक अद्याप थांबली नसली तरी दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची बाजू वरचढ ठरली आहे.
एलओसीजवळ बारामुल्ला येथे उरीच्या हथलंगा परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून जंगलभागात आश्रय घेतल्याचे मानले जात आहे. मात्र, संपूर्ण माहिती कारवाई पूर्ण झाल्यानंतरच उजेडात आणली जाणार आहे. शनिवारी झालेल्या चकमकीपूर्वी पोलिसांनी शुक्रवारी बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दोन मृतदेह हस्तगत करण्यात आले असून तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह सीमेजवळ आहे. पाकिस्तानच्या पोस्टवरून सतत गोळीबार होत असल्याने त्याचा मृतदेह अद्याप उचलण्यात आलेला नाही. शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचे या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात अतिरिक्त माहितीची प्रतीक्षा आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील हथलंगा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला मिळाल्यानंतर गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
अनंतनागमध्ये चकमक सुरूच
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागच्या गदुल कोकरनागमध्ये शनिवारी पाचव्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. डोंगराळ भागातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत ड्रोनचा वापर केला जात आहे. बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 19 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट्ट असे तीन बडे अधिकारी हुतात्मा झाले होते.
बॉम्बफेक, घेराव
दहशतवाद्यांचे लढाऊ साहित्य, रसद नष्ट करून त्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न सुरक्षा दल करत आहे. या घनदाट जंगलात वेढलेल्या दहशतवाद्यांवर ड्रोन, रॉकेट लाँचर आणि मोर्टारने हल्ले सुरूच आहेत. दहशतवादी कमांडर उझैर खान हा कोकरनागचा रहिवासी आहे. त्याच्यासोबत दोन-तीन विदेशी दहशतवादी आहेत. उझैरला गुहा, उंच पर्वत आणि घनदाट जंगलांमधील अऊंद दऱ्यांची पूर्ण माहिती असल्यामुळेच सुरक्षा दलांचे हल्ले टाळण्यासाठी दहशतवादी जागा बदलून लपून बसले आहेत. अशा स्थितीत दहशतवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. या लढ्यात यशस्वी होऊन घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर संदेश देणेही महत्त्वाचे असल्याने सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम जोरात सुरू आहे. पुढील महिन्यात हिवाळा सुरू होण्यापूर्वी घुसखोरी रोखणे आवश्यक आहे.









