अल-कायदा मॉड्यूलचा पर्दाफाश : एटीएसची गुजरात, दिल्ली-नोएडामध्ये कारवाई : सीमापार संबंध उघड
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका मोठ्या कारवाईत अल-कायदा मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एटीएसने चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुजरातमधून दोघांना तर दिल्ली आणि नोएडामधून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून सैफुल्ला मोहम्मद रफिक कुरेशी, मोहम्मद रईस फरदीन, मोहम्मद रिजवान फैक आणि झिशान अली अशी त्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेले चार दहशतवादी 20 ते 25 वयोगटातील आहेत. त्यांच्यावर भारतातील विविध शहरातील मोठ्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळले आहे. हे चार दहशतवादी सोशल मीडिया अॅप्सद्वारे एकमेकांशी जोडलेले होते, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याशिवाय त्यांचे सीमापार संबंध देखील उघड झाले आहेत. ही अटक सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. या कारवाईच्या माध्यमातून वेळीच एक मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात आला. गुजरात एटीएस आणि केंद्रीय संस्था आता दहशतवाद्यांचे नेटवर्क, वित्तपुरवठा, प्रशिक्षण आणि परदेशी संपर्कांचे दुवे तपासण्यात गुंतल्या आहेत. येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी खुलासे आणि अटक अपेक्षित आहे.
दहशतवादविरोधी संस्थेने बुधवारी एक निवेदन जारी करत गुजरात एटीएसने एक्यूआयएसशी संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली. या कारवाईअंतर्गत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएस या कारवाईबद्दल अधिक माहितीही जारी करणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये अहमदाबादच्या वेगवेगळ्या भागातून चार बांगलादेशी नागरिकांना या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
मोठ्या हल्ल्यांच्या कटात सहभाग
गुजरात एटीएसने सांगितले की, अटक करण्यात आलेले दहशतवादी भारतात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते, असे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाईल. हे चारही दहशतवादी सोशल मीडिया अॅप्सद्वारे एकमेकांशी आणि सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांना काही विशेष आणि संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते, असेही सांगण्यात आले.









