सत्ताधारी गटाला पाच तर विरोधी गटाला दोन सदस्यांचा फॉर्म्युला : प्रादेशिक आयुक्त शेट्टेण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या 23 व्या चार स्थायी समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात बिनविरोध पार पडली. सत्ताधारी गटातील पाच तर विरोधी गटातील दोन अशा प्रत्येक चार स्थायी समित्यांवर सात सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. मंगळवार दि. 12 रोजी बेळगाव महापालिकेच्या अर्थ व कर, आरोग्य, लेखा स्थायी समिती व बांधकाम या चार स्थायी समित्यांवर प्रत्येकी सात सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सकाळी 10 वाजल्यापासून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर छाननी करून निवडणूक रिंगणातील उमेदवारांची नावे जाहीर करणे आदी प्रक्रिया पार पडली. दुपारी 3 वाजता प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सत्ताधारी व विरोधी गटाकडून सदस्यांची नावे आधीच ठरविण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडण्यास मदत झाली.
आरोग्य स्थायी समितीतील नूतन सदस्य
सत्ताधारी गटातून लक्ष्मी राठोड, अभिजीत जवळकर, रूपा चिक्कलदिनी, नितीन जाधव, प्रीती कामखर तर विरोधी गटातील मोदिनसाब मतवाले, वैशाली भातकांडे यांची निवड करण्यात आली.
अर्थ व कर स्थायी समिती
सत्ताधारी गटातून संतोष पेडणेकर, रमेश मैल्यागोळ, जयंत जाधव, सारिका पाटील, रेखा हुगार तर विरोधी गटातील अजिम पटवेगार आणि अपरोझ मुल्ला यांची निवड करण्यात आली.
बांधकाम स्थायी समिती
सत्ताधारी गटातून संदीप जिरग्यागोळ, राजू भातकांडे, दीपा तोपगी, श्रेयस नाकाडी आणि माधवी राघोचे तर विरोधी गटातील ज्योती कडोलकर, शाहिदखान पठाण यांची निवड करण्यात आली.
लेखा स्थायी समिती
सत्ताधारी गटातून नंदू मिरजकर, रवी धोत्रे, नेत्रावती भागवत, वीणा विजापूरे, रवीराज सांबरेकर तर विरोधी गटातील अस्मिता भैरगौडा पाटील, शिवाजी मंडोळकर यांची निवड करण्यात आली. या नूतन स्थायी समिती सदस्यांकडून अध्यक्ष निवडला जाणार आहे. पुढील एक वर्षासाठी या समित्या काम करणार आहेत. निवड झालेल्या नूतन सदस्यांचे यावेळी उपस्थितांनी अभिनंदन केले.
नगरसेविका पूजा पाटील यांची माघार
सर्व चारही स्थायी समित्यांवर प्रत्येकी सात सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार अर्थ व कर, आरोग्य, बांधकाम या तीन स्थायी समित्यांवर सदस्यांची प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी बिनविरोध निवड केली. मात्र लेखा स्थायी समितीसाठी सातऐवजी आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी आठपैकी कोणाला माघार घ्यावयाची असल्यास त्यांनी माघार घ्यावी, अशी विचारणा केली. त्यावेळी नगरसेविका पूजा पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने लेखा स्थायी समितीची निवडणूकही बिनविरोध पार पडली.









