वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात चार जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चुराचंदपूर शहरापासून सुमारे 7 किमी अंतरावर असलेल्या मोंगजांग गावात ही घटना सोमवारी घडल्याचे सांगण्यात आले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात बंदूकधाऱ्यांनी 60 वर्षीय महिलेसह किमान चार जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात चारही जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक एका कारमधून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
प्राथमिक अहवालांवरून कारमधील लोकांवर अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याचे चुराचंदपूर जिल्हा मुख्यालयातील अन्य एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेतील बळीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरून 12 हून अधिक रिकामी काडतुसे सापडली आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तपासासाठी पोलीस आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.









