उचगाव / वार्ताहर
गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी येथील लोहिया मार्केटमधील चार दुकाने फोडून ७२ हजार रुपयांचा माल लंपास केला. त्यापैकी दोन दुकानमालकांनी गांधीनगर पोलीसांत याबाबत नोंद केली आहे. तर इतर दोन दुकानमालकांनी याबाबत नोंद केली नसल्याचे समजते.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, येथील जितेश नंदलाल वाधवा (वय ३८ वर्षे, रा. शांती सोसायटी, गुरुनानक मार्केटशेजारी गांधीनगर) यांचे लोहिया मार्केटमध्ये वासुदेव कलेक्शन नावाचे तयार कपड्यांचे दुकान आहे. तसेच या दुकानाशेजारी सतिश गगनदास आहुजा यांचे सतनाम ड्रेसेस नावाचे दुकान आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही दुकानांची कुलपे तोडून, शटर उचकटून दुकानातील शर्ट, पँट असा दोन्ही दुकानातील मिळून ७२ हजार सातशे रुपयांचा माल चोरुन नेला. तसेच या मार्केटमधीलच आणखी दोन दुकानात चोरी झाली आहे. परंतु या दोन दुकानमालकांनी याबाबत अद्याप पोलीसांत नोंद केलेली नाही. याबाबत गांधीनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.









