कॅमेऱ्यासह रक्कम लंपास
खानापूर : खानापूर शहरातील स्टेशन रोडवरील देशपांडे कॉम्प्लेक्समधील चार दुकानांमध्ये सोमवारी रात्री चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. यात टेकडी बॉन्ड रायटर, सुळकर मेडिकल, महेश सायबर, विकी फोटोग्राफर या दुकानांचे चोरट्यांनी शटर तोडून रक्कम आणि कॅमेरा लंपास केला आहे. शहर परिसरात पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अगदी रहदारीच्या रस्त्यावर ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या देशपांडे कॉम्प्लेक्समधील टेकडी बॉण्ड रायटर, सुळकर मेडिकल, महेश सायबर, तसेच विकी फोटोग्राफर या चारही दुकानांचे शटर चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करून टेकडी यांच्या दुकानातील आठ हजार रुपये, महेश सायबरमधील पाच हजार रुपये आणि इतर साहित्य, तसेच विकी फोटोग्राफर यांचा महागडा कॅमेरा आणि साडेपाच हजार रुपये, तसेच सुळकर मेडिकलमधील काही किरकोळ रक्कम, कॉसमेटीक, परफ्यूम तसेच इतर साहित्य लांबवले आहे. चोरट्यांनी शटर तोडण्यापूर्वी कॉम्प्लेक्सबाहेर असलेले सीसीटीव्ही तोडलेले आहेत. तर एका सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि राऊटरच लांबविला आहे.
मंगळवारी सकाळी दुकानांचे शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत असल्याचे काहींच्या निदर्शनास आल्यानंतर दुकान मालकांना याबाबत कल्पना देण्यात आली. दुकान मालकांनी येऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खानापूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. खानापूर पोलीस स्थानकातील गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. खानापूर शहर परिसरात, तसेच ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना पूर्णपणे थांबल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे.खानापूर, तसेच नंदगड पोलिसांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.









