प्रतिनिधी/ बेळगाव
अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्या पतीचा खून केल्याचे उघडकीस आले. प्रियकर व त्याच्या साथीदारांना घेऊन पतीचा खून केला. या घटनेमुळे बेळगावात खळबळ उडाली आहे. दरम्यान पत्नीनेच पोलीस स्थानकामध्ये जाऊन पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. हे प्रकरण एपीएमसी पोलिसांनी उघडकीस आणले. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
संध्या रमेश कांबळे, बाळू अशोक बिर्जे, जय उर्फ सोनू मोहन ससाणे, नितेश महादेव अवळी (सर्व रा. आंबेडकरनगर, बेळगाव) या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रमेश कांबळे याचा खून केल्याचे कबुल केले आहे. संध्या आणि बाळू बिर्जे यांचे अनैतिक संबंध होते. याची कुणकुण रमेश कांबळेला लागली होती. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.
रमेशला एका फळातून झोपेच्या गोळ्या संध्याने दिल्या. त्यानंतर दोरीने गळा आवळून रमेशचा खून केला. मृतदेह चोर्ला घाटामध्ये फेकून दिला आहे. त्यानंतर संध्याने स्वत:च 5 एप्रिल 2023 रोजी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये आपला पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता याप्रकरणात पत्नीच सामील असल्याचे उघडकीस आले.
एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून पत्नीला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता आपल्या साथीदारांसह पतीचा खून केल्याची कबुली दिली. या चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.









