निपाणीनजीक तवंदी घाटात दुर्घटना : विवाह सोहळय़ाला जाताना कंटेनरची कारला धडक
वार्ताहर /निपाणी
विवाह सोहळय़ाची तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईक, पाहुणे, मित्र परिवार यांचे स्वागत करण्यात येत होते. इतक्यात म्हणजेच सकाळी 9.50 वाजता अनेकांचे मोबाईल वाजले व भीषण अपघात घडल्याची माहिती मिळाली. अनेकांनी लग्नसोहळा सोडून घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयापासून जवळच घडलेल्या या अपघातात चार जण जागीच ठार झाले होते. यामध्ये नववधूच्या भावासह काका, काकू व चुलत आजीचा समावेश असल्याचे समजताच विवाह सोहळय़ासाठी आलेले सर्वजण दुःखसागरात बुडाले. ही घटना तवंदी घाटात हॉटेल अमरसमोर शुक्रवारी घडली.
महेश देवगोंडा पाटील (वय 25), आदगोंडा बाबगौडा पाटील (वय 60), छाया आदगोंडा पाटील (वय 55), चंपाताई बाळेशा मगदूम (वय 85, सर्वजण रा. बोरगाववाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. आदगोंडा व छाया पाटील नोकरीच्या निमित्ताने सध्या साईशंकरनगर-निपाणी येथे रहात होते. लग्न सोहळय़ासाठी येणाऱया नववधूच्या कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच कुटुंबांसह पाहुणे, नातेवाईक, मित्रपरिवार शोकसागरात बुडाले.
याबाबत अधिक माहिती अशी, कोडणी येथील दगडू बुदिहाळे यांचे चिरंजीव तथा माजी ता. पं. सदस्य सदाशिव बुदिहाळे यांचे पुतणे विनायक यांचा विवाह बोरगाववाडी येथील देवगोंडा पाटील यांची कन्या मयुरी हिच्यासोबत शुक्रवारी दुपारी 12.31 वा. आयोजित केला होता. या विवाह सोहळय़ाचे आयोजन ब्रह्मनाथ भवन स्तवनिधी येथे करण्यात आले होते. याची तयारी पूर्ण झाली होती. या सोहळय़ात सहभागी होण्यासाठी ते सर्वजण आपल्या कारमधून महामार्ग सेवा रस्त्याने येत होते. काही मिनीटांच्या अंतरावर आले असतानाच बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱया कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला व कंटेनरने कारला सुमारे 200 मीटर फरफटत नेत हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील चौघेही जागीच ठार झाले.
या घटनेविषयी मृतांचे नातेवाईक रामगोंडा पाटील यांनी कंटेनर चालक द्वारकासिंग उर्फ पार्श्वनाथसिंग (वय 53, रा. हुसेन बंगरा-बिहार) याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अपघातस्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीएसपी बसवराज यलिगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, फौजदार कृष्णवेणी गुर्लहोसूर, अनिलकुमार कुंभार यांनी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बोरगाववाडी येथे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न सोहळय़ाचा आनंद लुटत असतानाच पाटील व बुदिहाळे कुटुंबीयांवर अपघातातून दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी जमलेले नातेवाईक आक्रोश करत होते.
तीन वर्षांपूर्वीच्या अपघाताची आठवण
तवंदी घाटात शुक्रवारी घडलेल्या अपघातस्थळीच 5 जानेवारी 2021 रोजी अपघाताची घटना घडली होती. यामध्ये मुरगूड येथील जमादार कुटुंबातील सहा जणांसह ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे या अपघाताची घटनास्थळी चर्चा सुरू होती.
लाडक्या बहिणीच्या विवाहादिवशी…
बहिणीचा विवाह म्हणजे प्रत्येक भावासाठी आयुष्यातील महत्त्वाचा आनंदाचा क्षण. या सोहळय़ाची तयारी करताना महेशची गेल्या 8 दिवसांपासून धावपळ दिसत होती. काहीही उणीव राहू नये अशी त्याची धडपड सर्वांना दिसत होती. पण अक्षता पडण्यापूर्वीच अवघ्या 2 तासांपूर्वी महेशला काळाने नेले. यामुळे महेशला आपल्या भाऊजीचे कान पिळण्याची तर नववधू मयुरी हिला पाठवण करताना खांद्यावर डोके टेकून रडण्याचीही संधी मिळाली नाही.
कंटेनर चालकाविषयी तीव्र संताप
अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अपघातात चक्काचूर झालेली कार आणि मृतदेह पाहून निष्काळजीपणे वाहन चालविणाऱया ट्रक चालकाविषयी तीव्र संताप व्यक्त होत होता.
कारमधून मृतदेह काढताना शर्थीचे प्रयत्न
रंगांचे बॅरेल असणाऱया अवजड कंटेनरने विरुद्ध दिशेने सेवा रस्त्यावर भरधाव वेगाने येताना कारला सुमारे 200 मीटर फरफटत टेकडीवर नेले. यामध्ये कारचा चक्काचूर होताना सर्व मृतदेह अडकून पडले. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह काढताना पोलीस, अग्निशमन दल, हायवे पेट्रोलिंग यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. हे पाहताना मृतदेहांचे होणारे हाल पाहून अनेकांचे अश्रू अनावर होत होते.









