दिल्लीतील एनआयए न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनच्या (आयएम) चार दहशतवाद्यांना बुधवारी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी त्यांना दोषी जाहीर करण्यात आले होते. भारतविरोधी कट रचल्याप्रकरणी दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याच्या (युएपीए) विविध कलमांखाली दोषी ठरविण्यात आले होते. एनआयएने सप्टेंबर 2012 मध्ये त्यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोषींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 121ए (भारत सरकारविऊद्ध युद्ध पुकारणे) आणि 123 (युद्ध छेडण्याची योजना सुलभ करण्याचा हेतू लपवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर ‘युएपीए’च्या कलम 17 (दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करणे), 18 (कट रचणे), 18ए (प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे), 18बी (दहशतवादी कृत्यांसाठी लोकांची भरती करणे) आणि आणि कलम 20 (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) नुसार गुन्हा दाखल केला होता. दोषींनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कट, बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांसाठी भारताच्या विविध भागात, विशेषत: दिल्लीमध्ये नवीन सदस्यांची भरती केली. यामध्ये पाकिस्तानस्थित सहयोगी तसेच स्लीपर सेलची मदत आणि सहकार्य यांचा समावेश होता.









