कराड :
आगाशिवनगर (ता. कराड) येथे भरधाव इर्टिगा कारने रस्त्याकडून चालणाऱ्या नागरिकांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. कारचालक हा डॉक्टर असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
डॉ. राजाराम जगताप असे चालकाचे नाव आहे. तो ढेबेवाडी बाजूकडून कराड शहराकडे येत होता. सरिता बाजार परिसरात वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्याने जाणाऱ्या एका वृद्ध महिला व अन्य तीन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. घटनास्थळी क्षणात गोंधळ उडाला आणि संतप्त जमावाने संशयिताला कारमधून खेचून बाहेर काढत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी वेळीच धाव घेतली आणि जमावाला हटवत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि चालकाला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी घटनास्थळी कायम होती. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून चालकाची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई सुरू आहे.








