व्यसनमुक्ती केंद्रातून परतताच आई-वडील, बहीण, आजीला संपवले
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील पालम भागात एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील चार जणांची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजता घडली. केशव असे आरोपीचे नाव असून तो व्यसनाधीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडील दिनेश, आई दर्शना, बहीण उर्वशी आणि आजी दिवाना देवी अशी मृतांची नावे आहेत.
केशव हा व्यसनाच्या अधीन गेल्याने काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते. तेथून परतल्यानंतरही त्याचे व्यसन सुटले नाही. तो घरच्यांकडे ड्रग्ज आणि दारुसाठी नेहमी पैसे मागायचा. मंगळवारीही त्याने दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र, कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील चारही सदस्यांना वेगवेगळय़ा खोलीत नेऊन ठार केले. हत्येनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना चुलतभावाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरडाओरड ऐकून चुलतभावाची धाव
केशवच्या घरात वरच्या मजल्यावर भांडण सुरू होते. काही वेळाने बहिणीच्या किंचाळण्याचा आवाज आला. ती वाचवण्याची विनंती करत होती. तो काही लोकांसह घटनास्थळी पोहोचला असता आरोपीच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता, ही आमची कौटुंबिक बाब असल्याचे आरोपीने सांगितले, अशी माहिती आरोपी केशवला पकडणाऱया त्याच्या चुलतभावाने पोलिसांना दिली.
पोबारा करण्याचा प्रयत्न
कुटुंबातील चौघांची हत्या केल्यानंतर केशवने घरातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चुलत भावासह अन्य काही लोकांनी घरातील दृश्य पाहिल्यानंतर त्याला पकडले. लोकांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील फरशी रक्ताने माखलेली दिसली. तसेच आजूबाजूच्या खोल्यांमध्ये आणि बाथरुममध्ये आई-वडील, बहीण आणि आजी या चौघांचेही मृतदेह दिसून आले. या भयावह घटनेनंतर तातडीने पोलीस स्थानकाशीही संपर्क साधून त्यांना पाचारण करण्यात आले.
महिनाभरापूर्वी नोकरीला सोडचिठ्ठी
आरोपी केशवकडे सुरक्षित नोकरी नव्हती. तो गुडगाव येथील एका कंपनीत काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिनाभरापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. तेव्हापासून त्याचे घरातील लोकांशी पैशांवरून वारंवार भांडण होत असे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









