शवचिकित्सा अहवाल राखून, व्हिसेरा चाचणी होणार : मयताच्या अंगावर व्रण, मात्र लैंगिक अत्याचार नाही
- राजकारणाच्या सूडातून खून झाल्याचा संशय
- सोनालीवर गोमेकॉत ‘इन पॅमेरा’ शवचिकित्सा
- मृतदेहासह नातेवाईक हिस्सारकडे रवाना
प्रतिनिधी / म्हापसा
भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर हणजूण पोलिसांनी सोनालीचा निजी सचिव सुधीर सांगवान व त्याचा साथीदार सुखविंदर सिंग सांगवान यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सुधीर सांगवान यानेच खुनाचा कट रचल्याचा संशय आता पोलिसांनीही व्यक्त केला आहे. मृतदेहाची चिकित्सा ‘इन कॅमेरा’ करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घेऊन कुटुंबीय हिस्सार येथे रवाना झाले.
या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 अंतर्गत खुनाचा आणि कारस्थान रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. शवचिकित्सेचा अहवाल आल्यानंतरही सोनालीच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले आहे. खुनाची तक्रार दाखल करा आणि नंतरच शवचिकित्सा करा या भूमिकेवर ठाम राहिलेल्या सोनालीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी सामंजस्यपणा दाखविताना शवचिकित्सेला परवानगी दिली. त्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली.
सोनालीच्या मृत्यूचे गूढ कायम
सोनालीच्या मृत्यूचे गूढ उकलले नसल्यामुळे निर्माण झालेला संशयकल्लोळ अजून कायम आहे. सोनाली हिला हृदयविकाराचा झटका नव्हे तर तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांचा आहे. सोनाली यांचा सचिव सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर कुटुंबीयांनी ठपका ठेवला होता तो कायम आहे. त्यांनी मिळून सोनालीवर विषप्रयोग करून तिला मारण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
व्हिसेरा चाचणीनंतर निघणार निष्कर्ष
सोनालीच्या व्हिसेराची चाचणी करण्याची सूचना गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात आली आहे. व्हिसेरा चाचणी वेर्णा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये केली जाईल. व्हिसेरा चाचणीनंतर निष्कर्षावर येणे सोयीस्कर होणार आहे, असे शवचिकित्सा करणाऱया डॉक्टरांच्या पथकाचे मत आहे.
सोनाली पुन्हा लढणार होत्या हिस्सारमधून
सोनालीचा खून राजकीय हेतूने केला असल्याचा संशय सोनाली यांचा बंधू रिंकू ढाका याने अगोदरच व्यक्त केलेलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनाली यांनी हरियाणा राज्यातील हिस्सार येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. अलीकडच्या कालावधीत हिस्सार येथे काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोनाली जरा नाराज होत्या. हिस्सारमधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा होती.
मृतदेहासह नातेवाईक हिस्सारकडे रवाना
शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. सायंकाळी तो मृतदेह घेऊन त्यांचे कुटुंबीय हिस्सारकडे रवाना झाले असून तिच्या पार्थिवावर आज शुक्रवारी तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोव्यात केलेल्या शवचिकित्सेवर आम्ही समाधानी आहोत. शवचिकित्सा इन कॅमेरा झाल्यामुळे दिल्लीत पुन्हा शवचिकित्सा करण्याची गरज भासणार नाही, असेही रिंकू ढाका म्हणाले.
चंदिगडमध्येही करणार व्हिसेरा चाचणी : खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोनालीच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. गोव्यानंतर चंदीगडमध्येही सोनाली यांच्या व्हिसेराची चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोमेकॉत डॉ. सुनिल चिंबलकर व डॉ. मंदार कंटक यांनी सोनालीची शवचिकित्सा केली. त्यांनी वैद्यकीय अहवाल बनविला आहे, मात्र मृत्यूचे कारण जाहीर केलेले नाही.
मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे चुकीचे : रिंकू ढाका
सोनाली यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. शवचिकित्सा करण्यातही आलेली नव्हती, असे असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोनालीचे बंधू रिंकू ढाका यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. सोनाली या भाजपच्या वरिष्ठ नेत्या होत्या. मात्र तिच्याबाबत विचारपूस करण्यासाठी भाजपचे कोणीही पदाधिकारी पुढे आले नाही, असेही यावेळी ते म्हणाले.
लैंगिक अत्त्याचार झाल्याची अहवालात नोंद नाही
काही वृत्तपत्रांनी (तरुण भारत नव्हे) सोनाली यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे ठळकपणे म्हटले होते. लैंगिक अत्याचारांनंतर त्यांची हत्या केली असल्याचेही म्हटले होते. मात्र शवचिकित्सा अहवालात सोनाली यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. वैद्यकीय अहवालात डोळय़ांसह चेहऱयावर व शरीरावर व्रण आढळून आले आहेत. व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
रात्री उशिरापर्यंत संशयितांची चौकशी
काल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग सांगवान यांच्यासह अन्य दोघांची जबानी नोंद घेणे सुरू होते. सोनाली फोगट यांचा खून नेमका का करण्यात आला याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. सर्व तपास केल्यानंतर रात्री उशिरा या दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशल देसाई अधिक तपास करीत आहेत. रात्री उशिरा संशयित आरोपींना द ग्रॅण्ड लिओनी हॉटेल तसेच ज्या ठिकाणी सोनाली यांनी जेवण केले होते त्या हॉटेल कर्लीसमध्ये पोलिसांनी आरोपी समवेत तपासणी केली.