टाळसुरे, वार्ताहर
Ratnagiri News : दापोली तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास सुरू आहे.दरम्यान,एका घरातील चारजण बेपत्ता झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी विसापूर येथून भरत भेलेकर (वय- 34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव भेलेकर यांच्याबरोबर दुकानात जातो,असे सांगून निघून गेला.सहदेव हा दुकानात पोहोचला मात्र भरत हा दुकानात आला नाही.काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. तरीही तो आढळून आला नाही.भरत याचे अन्य नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला असता तो आढळून न आल्यामुळे पांडुरंग भेंलेकर यांनी दापोली पोलीस स्थानकात भरत बेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
याच कुटुंबातील भरत याची पत्नी सुगंधा भेलेकर ही 3 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते,असे सांगून आराध्य(वय-7) व श्री (वय-4) या मुलांना घेऊन मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे निघून गेली.सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्यामुळे मुलांचा व सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला,मात्र ती कोठेही आढळून आली नाही.तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशी केली असता तिचा कोणताही तपास लागला नाही. तसेच दूरध्वनीवरही संपर्क होत नसल्यामुळे सुगंधा भालेराव बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.एकाच घरातील चौघेजण बेपत्ता झाल्यामुळे यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे.









