प्रतिनिधी /पणजी
नुकत्याच संपलेल्या 2022 या मागील वर्षात अंमली पदार्थांची मात्रा (डोस) जास्त झाल्यामुळे 4 जणांना जीव गामवावा लागल्याचा संशय सरकारतर्फे विधानसभा अधिवेशानातील एका प्रश्नावरील लेखी उत्तरातून व्यक्त करण्यात आला आहे. तथापि रासायनिक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत त्यावर संशोधन चालू असून त्याची प्रक्रिया मंदगतीने होत असल्याने त्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आले नसल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
दरम्यान, गोवा राज्यात गेल्या काही वर्षात अमंलीपदार्थ अतिसेवनामुळे काही बळी गेले असले तरी सदर प्रयोगशाळेतून त्याची खात्री होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची नेंद अनैसर्गिक मृत्यू म्हणूनच केली जात असल्याचे सांगण्यात आले. खात्री होत नसल्यामुळे पोलीस खाते प्रयोगशाळेतील अहवालाच्या प्रतीक्षेत राहतात आणि मग तपास, चौकशीचे काम त्याच मुद्यावर अडकून पडते अशी परिस्थिती आहे.
वेश्या व्यवसायासाठी महिला तस्करी 2022 मध्ये कमी झाल्याचा दावा सदर उत्तरातून करण्यात आला आहे. गेल्याच 5 वर्षाच्या तुलनेत 2022 चे प्रमाण कमी असल्याचे उत्तरात म्हटले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास गोव्यात अंमलीपदार्थ खरेदी-विक्री व्यवहार आणि त्याचे सापडण्याचे प्रमाण बरेच मोठे असल्याचे आढळून आले आहे. शिवाय गोव्यातून तरूणींची तस्करी मोठ्याप्रमाणात होत असल्याचा विषयही ऐरणीवर आल्याचे दिसून येते.









