कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या उत्तर 24-परगणा जिह्यातील टीटागढ भागात शाळेच्या इमारतीच्या छतावर क्रूड बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली. 18-19 वयोगटातील संशयितांना रविवारी कमरहाटी आणि टिटागड परिसरातून अटक करण्यात आली. संशयितांची चौकशी करून सर्व संभाव्य पैलूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाळेचे वर्ग सुरू असतानाच शनिवारी छतावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. परंतु तीन मजली इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यावर विद्यार्थी आणि शिक्षक असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाचा आवाज ऐकून विद्यार्थी घाबरून वर्गाबाहेर पडले होते. त्यानंतर शिक्षकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तिघेजण शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक वैर हा स्फोटामागील प्राथमिक हेतू असल्याचे पोलिसांनी नमूद केले. आरोपींपैकी एकाच्या घराची झडती घेतली असता 10 क्रूड बॉम्ब सापडल्याची माहितीही त्यांनी दिली.









