मध्य प्रदेशातील बालाघाटच्या जंगलात चकमक
वृत्तसंस्था/ बालाघाट
मध्य प्रदेशात शनिवारी हॉक फोर्स आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन महिलांसह चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. तसेच चकमक झालेल्या भागात शोधमोहीम राबविली जात असून मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढू शकतो. बालाघाट जिह्यातील पचामा दर या डोंगराळ भागात ही चकमक झाल्याचे सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले.
चकमकीनंतर पोलिसांनी नक्षलींकडून ग्रेनेड लाँचर, एक एसएलए आणि इतर शस्त्रs जप्त केली. रुपझर पोलीस स्थानक परिसरातील बिथली पोलीस चौकीच्या पचामा दादरच्या जंगलात ही चकमक झाली. पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा यांनी चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शोधमोहीम संपल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असे मिश्रा यांनी सांगितले.
नक्षलवाद संपवण्याच्या प्रयत्नात मध्य प्रदेश पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. बालाघाट जिह्यातील लांजी पोलीस स्टेशन परिसरात यापूर्वीही अनेकवेळा नक्षलवाद्यांचे कारनामे घडल्याचे वृत्त आहे. यापूर्वी, डाबरी पोलीस चौकी येथे नक्षलवाद्यांशी चकमक झाली होती. सुरक्षा यंत्रणा व्यापक मोहीम राबविण्याच्या तयारीत असताना नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.









