गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे जप्त
बेळगाव : माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी आणखी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून एक कंट्री पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 27 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या गोळीबारात प्रणितकुमार डी. के. रा. द्वारकानगर, मंडोळी रोड, टिळकवाडी हा तरुण जखमी झाला होता. दुसऱ्या दिवशी निधा महम्मदआयुब कित्तूर (वय 39), तिचा भाऊ अमीर मोहम्मदआयुब कित्तूर (वय 29) दोघेही राहणार अन्नपूर्णावाडी, जबीन अतिफ किणेकर (वय 43) रा. आसद खान सोसायटी या तिघा जणांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर हजरतअली आप्पासाहेब मुल्तानी (वय 27) रा. आंबेडकर गल्ली, काकती, अफसर सुबानी पठाण (वय 29) रा. सदाशिवनगर, अर्शद खलीलअहमद कुरेशी (वय 23) रा. सिद्धेश्वरनगर, कणबर्गी, रेहान तौफिक शिकलगार (वय 18) रा. शनिवारपेठ, मिरज या चौघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून गावठी पिस्तूल व दोन काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या चौकडीने गावठी पिस्तूल कोठून मागवली, याची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी उपायुक्त रोहन जगदीश, निरंजन अरस आदी अधिकारी उपस्थित होते.









