सांप्रतच्या काळात खगोलशास्त्र या विज्ञानाच्या शाखेत मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. पृथ्वीच्या बाहेर काय आहे, याचा मानव अत्यंत जिज्ञासेने शोध घेत आहे. अंतराळात जीव तगून राहू शकतात का, या विषयावर सर्वाधिक संशोधन होत आहे. तसे पाहिल्यास मानवाला पहिल्यांना पाऊल ठेवून आता अनेक दशके लोटली आहेत. पण, पृथ्वीबाहेरच्या कोणत्यातरी ग्रहावर मानव स्थायी वस्ती करु शकेल काय, यावर बरेच प्रयोग केले जात आहेत. अमेरिका, रशिया, चीन आदी देशांसमवेत भारतानेही या क्षेत्रात चांगल्यापैकी प्रगती पेलेली दिसून येत आहे.
चीनने सध्या त्याच्या अंतराळ यानातून चार मूषकांना (उंदरांना) अंतराळ प्रवासासाठी पाठविले आहे. त्यांच्या समवेत तीन अंतराळयात्रीही आहेत. शून्य गुरुत्वाकर्षण आणि अत्यंत कमी जागा अशा स्थितीत जीव कशाप्रकारे जिवंत राहू शकतात आणि त्यांच्या शरिरावर या स्थितीचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास करण्यासाठी या मूषकांना अंतराळ यात्रेवर पाठविण्यात आले आहेत. 2030 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठविण्याची चीनची योजना आहे. या योजनेची पूर्वसज्जता म्हणून या मूषकांना अंतराळात पाठविण्यात आले आहे. ते तेथे काही आठवडे राहणार आहेत. त्यानंतर त्यांना पृथ्वीवर आणण्यात येईल आणि त्यांचे परीक्षण करण्यात येईल. त्यावरुन मानवाला चंद्रावर नेण्यासाठी कोणती सज्जता करावी लागणार आहे, याची कल्पना संशोधकांना येणार आहे. शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत मानवाला ठेवण्याचा प्रयोग अमेरिकेने अनेक वेळा केला आहे. अमेरिका आणि रशियाच्या संयुक्त अंतराळ स्थानकात भारताच्या अंतराळवीरालाही वास्तव्य करण्याची संधी मिळाली आहे. तथापि, चीन त्याचे प्रयोग स्वतंत्ररित्या आणि वेगळ्या प्रकारे करीत आहे. त्याच्या या मूषकांवरच्या प्रयोगांमधून काय निष्पन्न होते, याकडे चीनप्रमाणेच जगातील इतर देशांचीही दृष्टी लागून राहिली आहे.









