भटकळ-हालवळ्ळी येथील घटना
कारवार : धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालवळ्ळी येथे घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तींची नावे शंभू भट (वय 65), मादेवी भट (वय 40), मुलगा राजीव भट (वय 34) त्यांची सून कुसुमा भट (वय 30) अशी आहेत. शुक्रवारी दुपारी शंभू भट यांच्या मालकीच्या घरात चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्या तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या हत्याकांडामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीसुद्धा मालमत्तेच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. भटकळ ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेवेळी कुसुमा भट यांची मुलगी अंगणवाडीला गेली होती त्यामुळे ती मारेकऱ्यांच्या तावडीत सापडली नाही, असे सांगण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.









