मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. गांधीनगर ते राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर निर्माण करण्याची योजना असून 350 कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच निलजी ते सांबरा विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या विकासासाठी 58 कोटी खर्चाचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. लवकरच मंजुरी मिळवून कामाला प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी आणि चिंतनातून जगाला आदर्श ठरणारी घटना निर्माण करणे शक्य झाले आहे. जगातील एक बलाढ्या लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. सामाजिक न्याय, समानता, व्यक्तीस्वातंत्र्य ही घटनेने आम्हाला दिलेली मोठी देणगी आहे, असे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. अनेक संत, महात्म्ये या भूमीत होऊन गेले आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांच्या प्रयत्नांतून घटना साकार झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये गॅरंटी योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. संविधान दिन जागृतीसाठी संविधान जागृती फेरी आयोजित करून घटनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जागृती केली जात आहे.
नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 200 कोटी रुपये निधी खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सुसज्ज क्रीडांगण उभारण्यासाठी 60 कोटी खर्च करण्याचे नियोजन केले असून 2023-24 या वर्षात 10 कोटींमधून विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. राज्यामध्ये उद्भवलेल्या दुष्काळ निवारणासाठीही आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. तर शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक पाणीपुरवठा योजना राबवून अनेक हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी पाणी उपसा योजना राबविण्याचे नियोजन केले असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा आदी उपस्थित होते.









