संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर केला घणाघात
► वृत्तसंस्था / संयुक्त राष्टसंघ
काश्मीरमधील महिलांच्या अधिकारांसंबंधात पाकिस्तान बोलावे, ही त्या देशाची दांभिकता आहे. याच देशाने आपल्या सेनेला 1971 मध्ये सध्याच्या बांगला देशात चार लाख बलात्कार करण्यास अनुमती दिली. महिलांसंबंधी पाकिस्तानची भूमिका साऱ्या जगाला माहीत आहे, असा घणाघात भारताने केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत महिला आणि सुरक्षा या विषयावरील चर्चेत भारताने पाकिस्तानला उघडे पाडताना त्याच्या प्रत्येका आरोपाचा खरपूस समाचार घेतला.
पाकिस्तानच्या प्रतिनिधीने त्याच्या भाषणात काश्मीरमधील महिलांवर भारताच्या सैनिकांकडून अत्याचार होत असल्याचा स्वैर आरोप केला होता. या आरोपाला भारताच्या प्रतिनिधींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानमधील महिलांची परिस्थिती साऱ्या जगाला ज्ञात आहे. महिलांवर बलात्कार करण्याचा आदेश देऊन याच देशाने आपल्याच समाजाचे शिरकाण करण्याची योजना चालविली होती. आजही हा देश आपल्याच नागरीकांवर विमानातून बाँबहल्ले करण्यास आणि लहान मुलांचाही जीव घेण्यास मागेपुढे पहात नाही, अशी टीका भारताने केली.
ऑपरेशन सर्चलाईट
सध्याचा बंगाल देश पाकिस्तानचा भाग असताना, 1971 मध्ये पाकिस्तानी लष्कराने बांगला देशात ‘ऑपरेशन सर्चलाईट’ नामक एक भीषण मोहीम चालविली होती. या मोहीमेच्या अंतर्गत बंगाली भाषिक महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. चार लाखांहून अधिक बंगाली महिलांवर पाकिस्तानी सैनिकांनी बलात्कार केले होते. पाकिस्तानच्या त्यावेळच्या सरकारची या अत्याचारांना मूक संमती होती. हे अत्याचार मानवतेला काळीमा फासणारे होते. आज काश्मीरच्या महिलांसंबंधात खोटा गळा काढताना आपण पेलेल्या अत्याचारांची या देशाला आठवण होत नाही, हे आश्चर्यकारक आहे, अशी खोचक टिप्पणीही भारताच्या प्रतिनिधीने केली आहे.
पुराव्याशिवाय आरोप
पाकिस्तानच्या प्रतिनिधीने सुरक्षा परिषदेत भारतावर अनेक आरोप केले. भारतासंबंधी जगाचे मत कलुषित करण्याचा बराच प्रयत्न केला. तथापि, नेहमीप्रमाणे याहीवेळी आपल्या आरोपांना पुराव्यांचा आधार देण्याची आवश्यकता या देशाला वाटली नाही. पुराव्यांशिवायच भारताच्या विरोधात सर्व आरोप करण्यात आले. भारताने ही बाबही जगाच्या निदर्शनाला आणून दिली. महिलांसंदर्भात भारताचा इतिहास स्वच्छ आहे. पाकिस्तानला ते सहन होत नाही. यासाठी भारतावर खोटे आरोप केले जातात, असे प्रतिपादन भारताकडून केले गेले आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यार्थ भारताने सर्व संदर्भ आणि पुरावेही सादर केले आहेत. पाकिस्तानने आम्हाला उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी स्वत:ची वर्तणूक सुधारावी आणि जरा स्वत:च्या देशात डोकावून बघावे. स्वत:च्या देशात बऱ्याच सुधारणा करण्यास पाकिस्तानला वाव आहे, असा खोचक सल्ला देऊन भारताने पाकिस्तानला त्याच्याच औषधाची चव दाखविली आहे, अशी प्रतिक्रिया आहे.









