बस-कार अपघात : मृत गुलबर्गा जिल्ह्यातील
वार्ताहर/अथणी
अथणी-विजापूर राज्य मार्गावर कोल्हापूरहून देवदर्शन आटोपून अफजलपूर गुलबर्गाकडे निघालेली कार व बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात तिघेजण जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. राहुल मेळशी, राधिका मेळशी, चालक गिरीश बेळोरगी (वय 28), रमेश औरखोड अशी मृतांची नावे आहेत. त विनायक तिवारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, राहुल मेळशी, कुटुंबीय व नातेवाईक असे मिळून कारमधून पाचजण कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी दर्शन घेऊन ते परतत होते. दरम्यान अथणी शहराच्या बाहेर एक किलोमीटर अंतरावर विजापूरहून मिरजकडे बस जात होती. दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल मेळशी, गिरीश बेळोरगी आणि रमेश औरखोड यांचा जागीच मृत्यू झाला तर राधिका मेळशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.









