बारा तासांच्या अथक शोधकार्यानंतर सापडली कार : नौदल, तटरक्षक, पोलीस, अग्निशामक दलाचे प्रयत्न :कारचे दरवाजे कापून मृतदेह काढावे लागले बाहेर
प्रतिनिधी / वास्को
लोटलीहून कुठ्ठाळीमार्गे आगशीच्या दिशेने निघालेली कार झुआरी पुलाचा कठडा तोडून झुआरी नदीत कोसळण्याची भीषण घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर पावणे एकच्या सुमारास घडली. त्यात कारमधील चौघाजणांचा बुडून अंत झाला. यात तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. लोटलीतील आरावजो कुटुंबातील पती, पत्नी व दिर मिळून तिघेजण आगशीच्या ऑस्टिन फर्नांडिस या मित्राला त्याच्या आगशीच्या घरी सोडण्यासाठी गेले असता झुआरी पुलावर हा भीषण अपघात घडला. ऑस्टिन फर्नांडिस, हेन्री आरावजो, प्रिसीला पुझ, ऑल्वीन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या भीषण अपघातामुळे लोटली, आगशी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण गोव्याला हादरवून सोडले आहे.
मयत व्यक्ती आपल्या जीए-08öके-8334 क्रमांकाच्या डस्टर कारसह लोटलीहून आगशीला येत होते. दुर्दैवाने झुआरी पुलावर त्यांच्यावर काळाने झडप घातली. अपघातावेळी पुलावर येणारी-जाणारी काही वाहने अपघाताचा आवाज आल्याने थांबली. पुलाचा कठडा तोडून कार समुद्रात कोसळल्याचे लक्षात येताच त्यांचीही तारांबळ उडाली. काहींनी लगेच अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस व अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
रात्रभर मिळत नव्हती माहिती
मिळालेल्या माहितीनुसार झुआरी पुलावर एका दुचाकीला ओव्हर टेक करुन ही डस्टर कार पुढे पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण गेले आणि कारने पुलाच्या कठडय़ाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात तो कठडा मोडून कार झुआरीत कोसळली. त्या कारमध्ये कोण व किती लोक होते याबाबत रात्री व पहाटेपर्यंत काहीच माहिती उघड झाली नव्हती. मात्र, सकाळी त्या कारमध्ये लोटलीतील कुटुंबीय असल्याची माहिती उघडकीस आली. गुरुवारी दुपारपर्यंत कार मिळत नसल्याने संपूर्ण गोव्याचे या भीषण घटनास्थळी लागून राहिले होते.
वाढदिवस साजरा केल्यानंतर काळाचा घाला
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत आगशीचा ऑस्टिन फर्नांडिस हा लोटलीतील आरावाजो कुटुंबाचा मित्र होता. लोटलीत वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून आरावजो पती-पत्नी व दिर मिळून ऑस्टिन फर्नांडिसला आगशीला त्याच्या घरी सोडण्यासाठी आपल्या कारने निघाले होते.
बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत शोधकार्य
हा अपघात घडल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे कार शोधून काढणे शक्य झाले नाही. मात्र, शोधकार्य चालूच ठेवण्यात आले होते. हे शोध कार्य गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास म्हणजे तब्बल बारा तासांनंतर संपले.
कारच्या शोधासाठी घ्यावे लागले अथक परिश्रम
झुआरीच्या तळाशी गेलेली कार शोधून काढण्यास अथक प्रयत्न करावे लागले. या कामगीरीत गोवा पोलीस, गोवा अग्निशामक दल, भारतीय नौदल व तटरक्षक दलही सहभागी झाले होते. नौदल व मरिन पोलिसांच्या बोटी तसेच खासगी रॅम्प बार्ज तसेच सागरी कॅमेऱयांचाही शोधकार्यासाठी उपयोग करण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या कारचे ठिकाण सापडले. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या साहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आली. चारही मृतदेह त्या कारमध्ये चिरडलेल्या अवस्थेत होते. क्रेनच्या सहाय्याने कार बार्जवर उतरवून कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारची अवस्था छिन्नविशिन्न झाली होती. जवळपास अठरा तासांनंतर शोधकार्याला यश आले.
अनेक आमदार पोहोचले अपघातस्थळी
या अपघताची माहिती मिळताच सकाळी सकाळीच नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा, सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर तसेच कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास घटनास्थळी दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर व अन्य काही नेत्यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृत व्यक्तींचे काही कुटुंबीय घटनास्थळी हजर होते. त्यांना यावेळी हुंदका आवरता आला नाही. मध्यरात्रीनंतर घडलेल्या या अपघाताची माहिती सकाळी सर्वत्र पसरली. त्यामुळे कुठ्ठाळीच्या फेरी धक्क्यावर जवळपासच्या गावांतील लोकांची मोठी गर्दी उसळली होती. शोधकार्यात कार सापडल्यानंतर मृतदेह तेथून हलवेपर्यंत लोकांची गर्दी होती. नेत्यांसह काहींनी यावेळी पुलावरून सुरक्षा कठडे कमकुवत असल्याचे सांगून पुलावग्नरील वाहतुक असुरक्षित असल्याचा दावा केला. पुलावर सक्षम सुरक्षा असावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हा अपघात आगशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेला असून आगशी पोलीस या अपघात प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. गुरूवारी सकाळी घटनास्थळी दक्षिण गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.









