निपाणी तालुक्यातील घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या : कुटुंबांना हरवला कर्त्या मुलांचा आधार
शासनाकडून कुटुंबांना आर्थिक मदतीची गरज : विद्युत उपकरणे हाताळण्यासाठी जागृतीची आवश्यकता
वार्ताहर/ निपाणी
प्रत्येक घराघरात विजेची उपकरणे वापरणे ही गरज बनली आहे. अलिकडच्या काळात तर विजेच्या उपकरणांचा वापर वाढतच आहे. पण गरजेची असणारी विजेची उपकरणे वापरताना अनेकवेळा धोकादेखील होतो. याची प्रचिती गेल्या महिनाभरात येताना निपाणी तालुक्याने वाईट अनुभव घेतला आहे. 6 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यानच्या दीड महिन्यात चार युवकांचा वेगवेगळ्या घटनात बळी घेतला. पाठोपाठ घडलेल्या या घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
निपाणीत अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर धोकादायक बनले आहेत. वीज वाहिन्या लोंबकळत आहेत. यातून नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. यानंतर निपाणीत 6 जुलै रोजी भाजीपाला विक्रेत्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. मारुती गोलभावी (वय 32, रा. सोलापूर, ता. हुक्केरी) असे या युवकाचे नाव होते. निपाणी बाजारपेठेत घडलेल्या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.
निपाणी तालुक्यातील श्रीपेवाडी औद्योगिक वसाहत परिसरात आकाश संकपाळ (वय 25) या युवकाला मोबाईल चार्जिंगला लावताना जोराचा विजेचा धक्का बसला. 27 जुलै रोजी ही घटना घडली. सिव्हील अभियंता असणाऱ्या आकाशने अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात बस्तान बसवले होते. सुमारे 30 ते 40 जणांना रोजगार दिला होता. आई-वडिलांनी मोठ्या कष्टातून शिक्षण देऊन आकाशला शिक्षण दिले होते. पण एका घटनेने होत्याचे नव्हते करत संपूर्ण कुटुंबाचा आधारच हरवला.
यमगर्णी येथील 20 वर्षीय स्वप्नील घाटगेचा बांधकामावर पाणी मारण्याचे काम करताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली. रोजंदारीसाठी कष्ट करणाऱ्या युवकाचा झालेला हा मृत्यू घाटगे कुटुंबासाठी आधार तोडणारा ठरला. या घटना ताज्या असताना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करणाऱ्या अमर चव्हाण या निपाणीतील युवकाचा बळी घेतला. या महिन्याभरात घडलेल्या घटना संबंधित कुटुंबाचा आधार मोडणाऱ्या ठरल्या आहेत.
विजेच्या धक्क्याने घडलेल्या या घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाने केली आहे. पण घरात घडलेल्या या घटनांची सबब पुढे करत या मृतांच्या कुटुंबियांना कोणतीच आर्थिक मदत मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. पण घडलेल्या या घटना अपघातांचा भाग आहेत. मृत तरुणांमुळे संपूर्ण कुटुंबच अडचणीत आले आहे. याचे कष्ट पुढील काळात कायमपणे सोसावे लागणार आहे. यासाठी शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विद्युत उपकरणे, जागृती आवश्यक
हेस्कॉमच्या माध्यमातून घरगुती, शेती, कारखानदार ग्राहकांना वीजपुरवठा करताना मोबदला घेतला जातो. पण त्या प्रमाणात कुठेच मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. जत्राट हद्दीत शेतशिवारात काम करताना श्रीपेवाडी येथील शेतकऱ्याचा झालेला मृत्यू याचा पुरावाच आहे. गावागावात वीजवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. याचे नूतनीकरणात सुरक्षितता देणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर हेस्कॉमतर्फे विद्युत उपकरणे हाताळण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.









