वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मीडिया ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भरखान शहरातील राखानी मार्केटमध्ये झाला. दुचाकीमध्ये ठेवण्यात आलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट घडवून गर्दीमध्ये हाहाकार माजवण्यात आला. स्फोटाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमधून घटनास्थळाचे विदारक दृश्य आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक दिसत आहेत.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल कुद्दुस बिझेन्जो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी आपला उद्देश साध्य करण्यासाठी असे हल्ले करत आहेत. तो मानवतेचा शत्रू आहे. या घटनेची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नसली तरी थेट आणि पहिला संशय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीवर आहे. येथे मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चौकशी अहवाल मागितला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.









