तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोधमोहीम सुरूच : ‘जैश’च्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट संघटनेने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ कठुआ
जम्मू काश्मीरमधील कठुआ जिह्यातील राजबाग परिसरात गुरुवार, 27 मार्चपासून सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच या चकमकीत चार सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत. हुतात्म्यांमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या तीन जवानांचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत तिघेजण हुतात्मा झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हुतात्मा जवानांमध्ये तारिक हुसेन, जसवंत सिंग आणि बलविंदर सिंग यांचा समावेश आहे. चौथ्या सैनिकाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. या संघर्षात जखमी झालेल्या जवानांना जम्मू मेडिकल कॉलेज (जेएमसी) येथे रेफर करण्यात आले आहे. या चकमकीत डीएसपी धीरज सिंह आणि इतर चार जवान जखमी झाले. त्यांच्यावर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चकमकीत 7 सैनिक जखमी झाले होते.
9 दहशतवादी लपल्याची माहिती
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजबागच्या जाखोले गावात सुमारे 9 दहशतवादी लपल्याची बातमी मिळाली होती. यानंतर, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालत संयुक्त कारवाई सुरू केली. शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा परिसरात शोध मोहीम सुरू केली. लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसओजी यांचे संयुक्त पथक थर्मल इमेजिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर, बुलेटप्रूफ वाहने आणि स्निफर डॉगच्या मदतीने परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या प्रॉक्सी संघटना पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटशी (पीएएफएफ) संबंधित होते. ‘जैश’च्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट संघटनेने या चकमकीची जबाबदारी स्वीकारली आहे.
23 मार्चपासून मोहीम सुरू
23 मार्च रोजी हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाला सुरक्षा दलांनी घेरले होते. मात्र, हा गट तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. हे दहशतवादी नंतर सान्यालहून जाखोले गावात पोहोचले. हे गाव हिरानगर सेक्टरपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. सुरक्षा दलांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ परिसराला वेढा घातल्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांचा परिसरात अजूनही कडक बंदोबस्त आहे. ऑपरेशन सुरू असून इतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.









