वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रायल आणि हमास यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या शांतता करारानुसार इस्रायलच्या आणखी चार महिला ओलीसांची सुटका हमासकडून करण्यात आली आहे. या चारही महिला इस्रायलच्या सेनेतील आहेत. अशा प्रकारे या करारानंतर आतापर्यंत हमासने 7 इस्रायली बंधकांची मुक्तता केली आहे. तब्बल 477 दिवसांच्या नंतर या महिला आपल्या घरी परतल्या असून त्यांचे स्वागत करण्यात आले. या करारानुसार इस्रायलच्या सर्व ओलीसांची मुक्तता करण्यात येणार आहे.
कॅरिना अरीव्हृ डॅनिएला गिबोआ, नामा लेव्ही आणि लिरी अलबाग अशी या चार महिला सैनिकांची नावे आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला होता. या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांना बंधक बनविण्यात येऊन त्यांचे अपहरण करण्यात आले होते. तसेच 1,200 हून अधिक इस्रायली नागरीकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करुन युद्ध छेडले होते. या युद्धात जवळपास 50 हजार पॅलेस्टाईनी नागरीक प्राणांस मुकले होते. आता इस्रायल आणि हमास यांच्यात शांती करार झाला असून दोन्ही बाजू आपल्याकडील ओलीसांची आणि कैद्यांची मुक्तता करीत आहेत. इस्रायलनेही हमासचे 70 कैदी सोडले असून आतापर्यंत हा शांतता करार दोन्ही बाजूंनी पाळला गेला आहे.









