सुकामेवा दुकानातून चोरले होते 50 हजार : दोनच दिवसात लावला छडा
बेळगाव : खरेदीच्या बहाण्याने सुकामेव्याच्या दुकानात येऊन गल्ल्यातील 50 हजार रुपये पळविल्याप्रकरणी पोलिसांनी चार इराणी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर केवळ दोन दिवसात त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. शुक्रवार दि. 20 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देशपांडे गल्ली येथील शगुन ड्रायफ्रुट्स दुकानात ही घटना घडली होती. सीसीटीव्ही फुटेज व ऑटोरिक्षाचालकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या असून ते इराणचे असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांचे सहकाऱ्यांनी त्या इराणींची कसून चौकशी केली. हे सर्वजण प्रवासी व्हिसाद्वारे एक महिन्याच्या भारतभेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी सुकामेव्याच्या दुकानातील 50 हजारांचे पैशाचे बंडल पळविले आहे. सुकामेव्याच्या दुकानात दोन तरुणी व एक तरुण आले होते. यापैकी दोघे जण ऑटोरिक्षातून गेले. तर आणखी एक तरुणीविषयी माहिती मिळाली नव्हती. आता ती पण याच टोळीतील असल्याचे सामोरे आले आहे. पर्यटनासाठी भारतात येऊन ही चौकडी आपल्या कारनाम्यामुळे गजाआड झाली आहे. यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.









