चिपळूण :
मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या पोलीस व्हॅनला अपघात झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते येथे शनिवारी रात्री घडला. यात एक पोलीस अधिकारी तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुंबईतील हे पोलीस पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी रत्नागिरी येथे येत होते.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रविण सखाराम मडके (४३, नाकपाडा एम.टी, मुंबई शहर) यांनी दिली आहे. मडके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पालवे, पोलीस कॉन्स्टेबल तन्मय खानविलकर, तुषार डांगरे हे देखील जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी हे चौघेजण नाकपाडा एम.टी मुंबई शहर येथून शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते.
ते मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असताना कळंबस्ते येथे आले असता खराब रस्त्यामुळे चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मडके यांचे नियंत्रण सुटल्याने ही पोलीस व्हॅन रस्त्यालगत १५ ते २० फूट खोल जाऊन कलंडली. या अपघातात व्हॅनमधील पोलीस कॉन्स्टेबल मडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, कॉन्स्टेबल खानविलकर, डांगरे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शहरालगतच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.








