बैलहोंगल येथील घटना : तिघा जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱया अल्पवयीन मुलाला समज देण्यासाठी आलेल्या चौघा जणांवर चाकूहल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री बैलहोंगल, जनता प्लॉट परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी बुधवारी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
चाकूहल्ला व हाणामारीत पाचजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
मुनीर बेपारी (वय 25), अताउल्ला हुबळी (वय 32), मेहबुब हुबळी (वय 34), रफीक कोरविनकोप्प (वय 27, चौघेही रा. बैलहोंगल) अशी चाकूहल्ल्यातील जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल व खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. यावेळी झालेल्या झटापटीत रवि तिम्मण्णावर (वय 21) हा ही जखमी झाला आहे.
12 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. त्या मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीय संबंधित मुलाला समज देण्यासाठी जनता प्लॉट परिसरात पोहोचले. यावेळी झालेल्या वादावादीनंतर छेड काढणाऱया अल्पवयीन मुलाला मारहाण झाली. त्यानंतर त्याला समज देण्यासाठी आलेल्या चौघा जणांवर चाकूहल्ला करण्यात आला.
छेड काढणाऱया अल्पवयीन मुलासह पुरखान व मणिकंठ यांना अटक करण्यात आली आहे. रमजान, चौडाप्पा, रवी आदींना अटक व्हायची आहे. या घटनेनंतर बैलहोंगल जनता प्लॉट परिसरात काहीकाळ तणावाची स्थिती होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे.