बहुमजली निवासी इमारतीला आग, 16 ठार
वृत्तसंस्था/ दुबई
दुबईतील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळमधील दाम्पत्य आणि तामिळनाडूतील दोघे अशा एकंदर चार भारतीयांचाही समावेश आहे. भारतीय दुतावासाच्या मदतीने मृतदेह भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत नऊ जण जखमीही झाले आहेत. दुबईच्या अल रास भागातील एका निवासी इमारतीत रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर ती इतरत्रही पसरली. या इमारतीत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. आगीची माहिती मिळताच दुबई सिव्हिल डिफेन्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पोर्ट सैद अग्निशमन केंद्र आणि हमरिया अग्निशमन केंद्राचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या इमारतींमधून लोकांना बाहेर काढण्यात आले. पहाटे अडीचच्या सुमारास आग आटोक्मयात आणण्यात आली. या दुर्घटनेत पाकिस्तानातील तीन चुलत भाऊ आणि नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला आहे.









