70 तोळे चांदीचे दागिने, साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड लांबविली
प्रतिनिधी /खानापूर
बंद घरांना चोरटय़ांनी लक्ष्य बनविले असून खानापूर तालुक्यातील खैरवाड, अल्लेहोळ व बरगाव येथे सोमवारी चार ठिकाणी घरफोडी करुन एकूण 70 तोळे चांदीचे दागिने, साडेसात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. चारही ठिकाणी चोरटय़ांनी एकाच पद्धती चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने खानापूर तालुक्यात एकच घबराट पसरली आहे.
सोमवारी खैरवाड येथील संतोष पाटील घरात चोरी करुन चोरटय़ांनी तीस तोळे चांदीचे दागिने, पाच हजाराची रोख रक्कम लंपास केली तर अल्लेहोळ येथे चोरटय़ांनी दोन घरे फोडून साडेतीन तोळय़ाचे सोन्याचे दागिने लंपास केले. बरगाव येथील बाळकृष्ण पाटील यांचे सायंकाळी 4 वाजता घर फोडून चाळीस तोळे चांदी, चार तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 32000 चोरटय़ांनी लंपास केले आहेत आहेत.
खैरवाड येथे घरफोडी
सोमवारी खैरवाड येथील संतोष पाटील हे काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घराला कुलूप असलेले पाहून चोरटय़ांनी आपला डाव साधला. ही चोरी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. चोरटय़ांनी मागच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजाला आतून कडी लावून घेतली व घरातील कपाटे फोडून शोधाशोध केली. यात चोरटय़ांनी तीस तोळय़ांचे चांदीचे दागिने, पाच हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे. घरातील दोन्ही कपाटे तसेच ट्रंक चोरटय़ांनी फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त पसरले होते.
पैसे व दागिन्यांच्या शोधासाठी सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. दोन्ही कपाटातील सामान पूर्णपणे खाली टाकण्यात आले आहे.
संतोष पाटील व कुटुंबीय पितृपक्षाची पूजा असल्याकारणाने आपल्या मुख्य घरी आलेले होते. चोरटय़ांनी घर बंद असलेले पाहून मागील दार तोडून आत प्रवेश केला व कपाटे फोडून तीस तोळे चांदीचे दागिने व रोख पाच हजार घेऊन पलायन केले आहे. नंदगड पोलिसांत गुन्हय़ाची नोंद झाली आहे. नंदगड पोलिसांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. सोमवारी नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्लेहोळ, खैरवाड या गावात एकच दिवशी भरदुपारी चोऱया झाल्या आहेत. या चारही घरफोडीत चोरीची पद्धत एकच असून मागच्या दाराची कडी तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करुन ऐवज लांबविला आहे. बंद घरे पाहूनच चोरटे दुपारीच आपला कार्यभाग साधत आहेत. यामुळे पोलिसांची व गावकऱयांची डोकेदुखी वाढलेली आहे .प्रत्येक ठिकाणी बंद घर असलेले पाहूनच चोरी करण्यात येत आहे. आजपर्यंत झालेल्या चोऱयांचा तपास लावण्यात नंदगड व खानापूर पोलिसांना यश आलेले नाही, याबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अल्लेहोळ येथे दोन घरफोडी

घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून आजूबाजूला असलेल्या दोन घरात घरफोडी झाल्याची घटना अल्लेहोळ येथे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यामुळे नागरिकांत एकच घबराट निर्माण झाली आहे.
येथील पांडुरंग यल्लाप्पा पाटील यांच्या घरच्या समोरील दरवाजाला असलेला कुलूप पाहून चोरटय़ाने पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व एका ट्रंकमध्ये असलेले साडेतीन सोन्याचे तोळय़ाचे दागिने लंपास केले. दरम्यान, दुसऱया एका ट्रंकमध्ये आणखी दागिने व रोख रक्कम होती. सुदैवाने त्या ट्रंककडे चोरटय़ांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे घरातील आणखी ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला नाही. याच दरम्यान त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या प्रभाकर बळीराम पाटील यांच्याही घराला समोरून कुलूप असल्याचे पाहून पाठीमागून दरवाजा तोडून चोरटय़ाने घरात प्रवेश केला. पण तेथील केवळ एक हजार व काही किरकोळ चांदी चोरटय़ाने लांबवली आहे. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.
भरदुपारी घरफोडी झाल्याने चापगाव व अल्लेहोळ परिसरात एकच घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसापासून खानापूर तालुक्मयात अनेक गावांमध्ये बंद असलेली घरे लक्ष्य केली आहेत. तालुक्यात होत असलेला चोरीचा छडा लावण्यास पोलीस असमर्थ ठरले आहेत. ग्रामीण भागात शेतवडीत गावच्या बाजूला असलेल्या घरातून चोरी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









