बेळगाव : कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकविण्यासह महाराष्ट्रपर घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांनी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला होता. सदर खटल्याच्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने संग्रामसिंह कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती, संतोष माळवीकर यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्यानुसार शुक्रवारी चौघेही न्यायालयासमोर हजर झाल्याने त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांनी लालपिवळा ध्वज उभारला होता. त्याच दिवशी 21 जानेवारी 2021 रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व त्यांचे सहकारी कोनेवाडीत दाखल झाले. त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली.
तसेच सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे कन्नड आणि मराठी भाषिकांत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती आणि संतोष माळवीकर यांच्यावर काकती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी चौथे जेएनएफसी न्यायालयात सुरू होती. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सर्वांना वॉरंट जारी केले होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी विजय देवणे न्यायालयासमोर हजर राहिल्याने त्यांना जामीन मंजूर झाला होता. उर्वरित चौघे शुक्रवारी न्यायालयासमोर हजर झाल्याने वॉरंट मागे घेत न्यायालयाने चौघांनाही सशर्त जामीन मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी दि. 5 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी दोषारोप निश्चित केला जाणार आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. श्यामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर काम पाहत आहेत.









