ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लाईट दुरूस्त करणारे (टॉवर) इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने 4 गँगमनला आपला प्राण गमवावा लागला. तर एक गँगमन गंभीर जखमी आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळच्या कोटमगाव शिवारात पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष भाऊराव केदारे (वय 38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्माराम अहिरे (40) आणि संतोष सुखदेव शिरसाठ (38) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे कोटमगाव शिवारात पोल नंबर 15 ते 17 मध्ये ट्रॅक मेंटेन करण्याचे काम सुरू होते. पाच गँगमन या ठिकाणी ट्रॅक मेंटेन करण्याचे काम करत होते. त्यावेळी लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन चुकीच्या बाजूने म्हणजेच लासलगाव बाजूने निफाडकडे आल्याने त्याची या गँगमनना जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झालेल्या चार गँगमनचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे रुळावर उतरुन टॉवर इंजिन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करत आंदोलन केले.
अधिक वाचा : पोटनिवडणुकीत विधान परिषदेची पुनरावृत्ती होणार








