कोल्हापूर :
विरार (मुंबई) येथील ‘जालनावाला स्पोर्टस् सेंटर च्या ४ तायक्वांदोपटूंचा दक्षिण कोरियामध्ये स्पर्धेत सहभाग झाला आहे, हे स्पर्धक कोल्हापूर शाखेतील असून, त्यांना भारतीय संघातर्फे सहभागी होण्याची संधी मिळाली. १८ वी जागतिक तायक्वांदो कल्चरल एक्सपो-२०२५ स्पर्धा १७ रोजीपासून सुरु झाली आहे. ही स्पर्धा २२ जुलै पर्यंत सुरू राहाणार आहे.
संपदा पिसे, सुदिक्षा पिसे, आयुष आडनाईक अशी जागतिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोल्हापुरातील तायक्वाँदोपटूंची नावे आहेत. या तिघांसोबत जेएसटीएआरसी कोल्हापूर शाखेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले हेही भारतातर्फे स्पर्धेत सहभागी होत आहेत.
या चौघांचीही तायक्वाँदोमधील मागील कामगिरीची दखल घेऊन स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करताना संपदा, सुदिक्षा, आयुष यांच्यासह अमोल यांना जागतिक पातळीवर तायक्वांदो स्पर्धा कशी खेळली जाते, त्यातील कौशल्य कशा पद्धतीचे आहे, जागतिक दजचि खेळाडू तायक्वाँदो खेळताना प्रतिस्पर्धांना कसे हरवतात यासह तायक्वाँदोमधील विविध पैलु आत्मसात करता येणार आहेत.
दरम्यान, हे चौघेही भारतीय संघासोबत दक्षिण कोरियात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक तायक्वांदो कल्चरल एक्स्पो २०२५ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही कोरियातील तायक्वांदो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायक्वाँदो वॉन (मुजु पार्क, जलाबोकदो राज्य) या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायक्वाँदो क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे. या स्पर्धेतून कोल्हापूरच्या चौघांनाही तायक्वाँदोमधील फाईट, पुमसे या दोन क्रीडा प्रकारांचे आधुनिक कौशल्य आत्मसात करता येणार आहेच. शिवाय त्यांना अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले तर त्यातून स्वसंरक्षण कसे करायचेही यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
इतकेच नव्हे तर कोरियामध्येच जागतिक दर्जाचे तायक्वाँदोचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राला कोल्हापुरातील चौघांना भेट देता येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागामुळे चौघांनाही कुक्कीवॉन नामक जागतिक हेड क्वार्टर पाहण्याची ही अत्यंत दुर्मिळ संधी मिळणार आहे. या चौघांना जेएसटीएआरसीचे प्रमुख प्रशिक्षक आणि तायक्वाँदो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
- जागतिक तायववाँदो कल्चरल एक्स्पोमध्ये सहभाग म्हणजे सुवर्णसंधी
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक तायक्वाँदो कल्चरल एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे तायक्वाँदो खेळात भाग्याचे मानले जाते. हे भाग्य संपदा पिसे, सुदिक्षा पिसे, आयुष आडनाईक यांच्यासह प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांना लाभले आहे. शिवाय हे चौघेही भारतातर्फे एक्सपोत सहभागी होत आहेत याचाही विशेष आनंद वाटतो. या चौघांना स्पर्धेच्या माध्यमातून तायक्वाँदोमधील जागतिक पातळीवर कौशल्य आत्मसात करता येणार आहे. हे कौशल्य त्यांनी कोल्हापुरात परतल्यानंतर आपल्या सेंटरमधील तायक्वाँदोपटूंना शिकवावे एवढीच अपेक्षा आहे.
– निलेश जालनावाला (तायक्वांदो तज्ज्ञमास्टर)








