वृत्तसंस्था/ कोरापूट
ओडिशामधील कोरापूट जिह्यात रविवारी बस उलटून झालेल्या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले. बोईपरीगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुप्तेश्वरजवळील डोकरीघाट येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कटकमधील नियाली येथून निघालेली बस सुमारे 50 भाविकांना घेऊन गुप्तेश्वर मंदिराकडे जात होती. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांची सुटका केली आणि त्यांना बोईपरिगुडा रुग्णालयात दाखल केले.
घाटमार्गातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. मृतांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच गंभीर जखमींवर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचार व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. अपघातातील बळी हे कटक जिह्यातील नियाली भागातील रहिवासी आहेत. येथील रहिवासी राज्यातील विविध मंदिरांच्या दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. शनिवारी रात्री कालाहंडीतील माँ माणिकेश्वरीचे दर्शन घेऊन हे भाविक कोरापूटमधील प्रसिद्ध शैव क्षेत्र गुप्तेश्वर येथे जात होते.









