पंतप्रधान मोदी 15 देशांच्या नेत्यांसोबत करणार द्विपक्षीय बैठक : सुनक यांच्यासह चार नेत्यांची आज भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी जागतिक नेत्यांची जमवाजमव सुरू झाली आहे. ही परिषद शनिवार, 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असली तरी शुक्रवारीच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख येण्यास सुरुवात झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक शुक्रवारपासूनच व्यस्त झाले आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार संध्याकाळपासूनच्या पुढील 96 तासांमध्ये म्हणजेच चार दिवसांमध्ये 15 जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका करणार आहेत. शुक्रवारीच पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या नेत्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 3 राष्ट्रप्रमुखांची बैठक घेतली आहे.

पंतप्रधान मोदी शनिवारी जी-20 परिषदेशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. याशिवाय ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह चार देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत. सुनक यांच्याव्यतिरिक्त ते जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबतही द्विपक्षीय बोलणी करणार आहेत. त्यानंतर रविवारी पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना जेवणाचे निमंत्रण दिले होते. याच कारणामुळे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनाही पंतप्रधान मोदींनी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदींच्या शासकीय निवासस्थानी जेवणाच्या वेळीच दोन्ही नेते बैठक घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह कोमोरोस तुर्की, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन, ब्राझील आणि नायजेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. एकूण 15 नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय बैठकीची आतापर्यंतच्या वेळापत्रकात नोंद आहे.
9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 परिषद
भारताच्या अध्यक्षतेखाली 18 वी जी-20 बैठक 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होत आहे. जगाच्या जीडीपीच्या 85 टक्के भाग घेणाऱ्या 20 देशांच्या या गटाचा जागतिक व्यापारात 75 टक्के वाटा आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक जी-20 मध्ये समाविष्ट असलेल्या देशांमध्ये राहतात. यासंदर्भात, ही जगातील अर्थव्यवस्थेची सर्वात शक्तिशाली शक्ती मानली जात असून त्याचे आयोजन भारत करत आहे. जी-20 परिषदेत येत्या काही वर्षांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्मयता आहे. प्रगती मैदानावर नुकत्याच बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्र भारत मंडपम येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. जी-20 मध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व राष्ट्रप्रमुखांचे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री स्वत: विमानतळावर पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांवर विविध कामांची जबाबदारी सोपवली असून ते स्वत: तयारीवर लक्ष ठेवून आहेत.









