चिटफंड घोटाळा प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात
वृत्तसंस्था/गांधीनगर
भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू एका मोठ्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गुजरात पोलिसांच्या सीआयडी क्राईम ब्रँचने 450 कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळाप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे मोठे आमिष दाखवत फसवणूक केल्यानंतर गुजरातस्थित कंपनीने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. या योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी दिली. शुभमन गिल याने 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर अन्य खेळाडूंनी त्यापेक्षा कमी रक्कम गुंतवली होती. गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने सीआयडी तो मायदेशी परतल्यानंतर त्याची चौकशी होऊ शकते. भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवले. कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केल्यानंतर सुमारे 14 हजार लोकांनी त्यात गुंतवणूक केली होती.









