पुणे / प्रतिनिधी :
कात्रज परिसरातील भिलारवाडीमधील जनसेवा फाउंडेशनच्या अनाथ व निराधार मुलांसाठीच्या अनाथालयातील चार अल्पवयीन मुले पसार झाल्याने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अविनाश संजय महामुनी (वय 28, रा. कात्रज, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. तक्रारदार अविनाश महामुनी काम करत असलेल्या जनसेवा फाउंडेशनमधील 12, 14 वर्षाचा, आठ आणि नऊ वर्षे या वयाची अनुक्रमे चार मुले कुणीतरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेली आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, या मुलांपैकी कुणाचाही अद्याप शोध लागला नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव यांनी दिली.









