प्रवासी राहणार सुरक्षित : रेल्वेचा डिजिटल पहारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे आता प्रवाशांच्या सुरक्षेवरुन मोठे पाऊल उचलणार आहे. प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने रेल्वेने सर्व डबे आणि इंजिन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काही मार्गांवर कॅमेऱ्यांच्या यशस्वी चाचणीनंतर घेण्यात आला. यासंबंधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाची समीक्षा केली आहे.
उत्तर रेल्वेच्या लोको आणि डब्यांमध्ये करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. यामुळे रेल्वेमंत्र्यांनी 74 हजार डबे आणि 15 हजार इंजिन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अनुमती दिली आहे. प्रत्येक डब्यात 4 डोम-टाइप कॅमरे बसविण्यात येणार आहे. डब्यांच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकी एक आणि प्रत्येक इंजिनमध्ये 6 कॅमेरे असणारआहेत. तर केबिन (फ्रंट आणि रियर)मध्ये एक-एक डोम कॅमेरा आणि दोन डेस्क-माउंटेड मायक्रोफोन लावण्यात येतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
डाटा प्रायव्हसीही राहणार सुरक्षित
सीसीटीव्ही कॅमेरे केवळ सामान्य वाहतुकीच्या हिस्स्यांमध्ये लावण्यात येणार आहे. याचा उद्देश प्रवाशांचे खासगीत्व कायम राखत सुरक्षा वाढविणे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. 100 किलोमीटर प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेंमध्येही स्पष्ट व्हिडिओ कॅप्चर करणारे आणि कमी प्रकाशातही चांगली कामगिरी करणाऱ्या कॅमेऱ्यांची निवड केली जाणार आहे.
एआयही देखील असणार भूमिका
एसटीक्यूसी सर्टिफाइड आधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच इंडियाएआय मिशनच्या सहकार्याने सीसीटीव्ही डाटावर एआय आधारित विश्लेषणाच्या शक्यता शोधल्या जाणार आहेत, यामुळे संशयास्पद हालचालींची जलदपणे ओळख पटविली जाणार आहे. रेल्वेचे हे पाऊल केवळ प्रवाशांच्या सुरक्षेला नवा स्तर देणारे नसून संघटित गुन्हेगारी टोळी आणि चोरांना आळा घालण्यासही मदत करणार आहे.









