रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही
मडगाव : कुळे-वास्को प्रवासी रेलगाडी खाली सापडून चार गुरे दगावण्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी मडगावच्या दामोदर कॉलेज जवळ घडली. त्यामुळे कुळे-वास्को रेलगाडी काही वेळ ट्रेकवर थांबविण्यात आली. रेलगाडी सापडलेली गुरे हटविल्यानंतर रेलगाडीने वास्कोकडे प्रयाण केले. रेलगाडी खाली गुरें सापडल्याने गाडी काही वेळ थांबविणे भाग पडले तरी रेल्वे वाहतुकीवर त्यांचा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. मडगावच्या दामोदर कॉलेज जवळ गुरें रेल्वे खाली सापडण्याचे प्रकार या पूर्वी देखील घडले आहेत. या पूर्वी या भागात रेड्याच्या धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी धिरयोतील रेडे एकमेकांचा पाठलाग करताना रेल्वे ट्रेकवर पोचले व त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वे खाली सापडून दोघेही ठार झाले होते. दामोदर कॉलेज जवळील रेल्वे ट्रेक हा खास करून गुरांसाठी धोकादायक बनला आहे. त्यावर उपाय योजना आखावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.









