दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये महिलांचा विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर देशभरात संताप व्यक्त होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी यासंबंधी शुक्रवारी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. गुरुवारी सकाळपासूनच संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहेत. पहिल्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत मुख्य सूत्रधारासह तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आणखी एकाला जेरबंद केल्याने अटक करण्यात आलेल्यांचा आकडा चारवर पोहोचल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात घडलेली घटना लज्जास्पद असून संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या घटनेने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मी दोषींना योग्य शिक्षा देण्याचे आश्वासन देतो. सरकारच्यावतीने आम्ही न्यायालयात बाजू मांडताना फाशीची मागणी करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच हिंसाचार बंद करण्याचे आवाहनही त्यांनी राज्यातील लोकांना केले. सुरक्षा दलांच्या कारवाईदरम्यान रस्ते अडवू नका आणि सुरक्षा दलांना रोखू नका. या घटनेचा मी राज्यातील जनतेच्या वतीने निषेध करतो, असे ते पुढे म्हणाले.
राज्यपालांकडून आढावा
राज्यपाल अनुसुईया उईके यांनी शुक्रवारी इंफाळमधील राजभवन येथे पोलीस महासंचालक राजीव सिंग यांची भेट घेत मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. या घटनेचा निषेध करत, त्यांनी डीजीपींना या जघन्य गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि त्यांना कायद्यानुसार अनुकरणीय शिक्षा देण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले. गरज भासल्यास पीडितांना विशेष संरक्षण देण्यासही राज्यपालांनी डीजीपींना सांगितले.
शांतता, स्थिरतेसाठी सरकार प्रयत्नशील
या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत मुख्यमंत्र्यांनी हा मानवतेविऊद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. या जघन्य अपराधावर आपले सरकार गप्प बसणार नाही, असे सांगितले. व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी सायबर गुन्हे विभागाला याची पडताळणी करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. आपले सरकार राज्यात शांतता आणि स्थिरता पूर्ववत करण्यासाठी शक्मय ते सर्व प्रयत्न करत आहे. त्याअंतर्गत विविध नागरी संस्था, उद्योजक, विविध समाजातील धर्मगुरू यांच्याशी चर्चा केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.









