न्यायालयासमोर हजर केले असता हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर : तालुक्यातील देवलत्ती येथील महेश नारायण सीमनगौडर (वय 35) यांना 29 डिसेंबर रोजी शेतातून अपहरण करून लोकोळी, पारिश्वाड, कोडचवाड, बडस यासह इतर ठिकाणी नेऊन मारबडव करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप लक्ष्मण चलवादी (वय 27) रा. कग्गणगी, राघवेंद्र प्रकाश चलवादी (वय 32) रा. लक्केबैल, मारुती तानाजी कांबळे (वय 28) रा. देवराई, राजशेखर शंकर हिंडलगी (वय 39) रा. एम. के. हुबळी या चौघांना खानापूर पोलिसांनी रविवार दि. 5 रोजी विविध ठिकाणांहून अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेश नारायण सीमनगौडर हे आपल्या शेतात काम करत होते. 29 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता त्यांचे अपहरण करून लोकोळी येथे आणून मारहाण केली. त्यानंतर कोडचवाड, कग्गणगी, पारिश्वाड, बडस क्रॉस अशा विविध ठिकाणी नेऊन महेश सीमनगौडर याला अमानुषपणे मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात त्याच्या गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात जखमा करण्यात आल्या आहेत. पारिश्वाड येथे महेश यांना मारहाण करताना आरडाओरडा केल्याने नागरिकांनी त्याला सोडवून घेतले. पारिश्वाड येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून खानापूर येथील
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खानापूर पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी विशेष पथक तयार करून वरील आरोपींचा शोध सुरू केला. हे सर्व आरोपी हल्याळ येथील एका लॉजवर राहिले होते. पोलीस आपल्या मागावर आहेत. असे समजताच त्यांनी तेथून पलायन केले होते. पोलीस वरील सर्व आरोपींच्या शोधासाठी प्रयत्नशील होते. वरील सर्व आरोपींना विविध ठिकाणी रविवारी ताब्यात घेऊन खानापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले. चौकशी करून त्यांच्यावर अपहरण, जिवे मारण्याचा प्रयत्न, सामाजिक शांतता बिघडवणे, समाजात दहशत माजवणे यासह विविध कलमाखाली गुन्हा नोंद करून संदीप चलवादी, राघवेंद्र चलवादी, मारुती कांबळे, राजशेखर हिंडलगी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.









