विजापूर सीईएन विभागाची कारवाई : चौघे आरोपी बेळगाव जिल्ह्यातील
बेळगाव ; आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, असे सांगत विजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 20 लाख रुपयांना गंडविणाऱ्या महिलेसह चौघा जणांना विजापूर सीईएन पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व जण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. बबलेश्वर येथील चंद्रशेखर बसाप्पा कन्नूर या शेतकऱ्याला फसविल्याच्या आरोपावरून लक्ष्मी रामाप्पा कंकणवाडी (वय 22) रा. संगनकेरी, ता. गोकाक, इराण्णा कौजलगी (वय 46) रा. कोळदूर, ता. बैलहोंगल, आप्पासाहेब बाबू इंचल (वय 66) रा. बस्ती गल्ली, हलगा, ता. बेळगाव, सुनील काशिनाथ दोडमनी (वय 37) रा. चिकोडी अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख एच. डी. आनंदकुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश अवजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या सर्व चौघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे. पांढऱ्या पैशाच्या बदल्यात चारपटीने काळा पैसा देण्याचे आमिष दाखवत या टोळीने शेतकऱ्याला ठकविले आहे. सुरुवातीला चंद्रशेखर कन्नूर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी काळ्या-पांढऱ्या पैशांचा व्यवहार सांगितला. विश्वास बसावा यासाठी 5 हजारांच्या बदल्यात शेतकऱ्याला जादा पैसे देण्यात आले. 3 ऑगस्ट 2023 रोजी विजापूर येथील अतालट्टी क्रॉसजवळ चंद्रशेखर या शेतकऱ्याला पैसे आणण्यास सांगितले. चौकडीच्या आमिषाला बळी पडून शेतकऱ्याने आपल्याजवळील 20 लाख रुपये त्यांना देण्यासाठी नेले. 20 लाख रुपये घेऊन त्याच्या बदल्यात पैशांऐवजी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये नोटबुक व पांढरे कागद बांधून दिले. आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्याने विजापूर येथील सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. चौकडीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस निरीक्षक रमेश अवजी व त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.









